नाशिक ( वृत्तसंस्था ) ;- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात ‘नाशिक मेट्रो’साठी २ हजार, ९२ कोटी रुपयांची तरतूद करीत असल्याची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे नाशिकचे ‘मेट्रो’ स्वप्न पूर्ण होणार आहे. या घोषणेचे नाशिकमध्ये स्वागत करण्यात आले. सार्वजनिक वाहतुकीला चालना देण्यासाठी आणि बसव्यवस्था सक्षम करण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात १८ हजार कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली आहे. त्यात नागपूर मेट्रोसाठी ५ हजार, ९७६ कोटी, तर नाशिक मेट्रोसाठी २ हजार, ९२ कोटी रुपयांच्या तरतुदीचा समावेश आहे.

नाशिक: केंद्रीय अर्थसंकल्पात नाशिक येथे ‘निओ मेट्रो’ प्रकल्पास मंजुरी देण्यात आली आहे. हा ‘निओ मेट्रो’ प्रकल्पास ‘नॅशनल प्रोजेक्ट’ म्हणून मान्यता देण्यात आली आहे, हे अभिमानास्पद आहे,’ असे प्रतिपादन भाजप महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आमदार देवयानी फरांदे यांनी केले. त्या येथील ‘वसंतस्मृती’ या भाजप कार्यालयात बोलत होत्या. याप्रसंगी शहराध्यक्ष गिरीश पालवे, पवन भगूरकर यांसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना फरांदे म्हणाल्या की, ‘कोरोना पार्श्वभूमीवर जागतिक मंदी असताना ऐतिहासिक आणि ‘आत्मनिर्भर भारता’चे प्रतीक असणारा हा अर्थसंकल्प आहे.







