अमळनेर शहरातील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) – मानवी शरीरास अपायकारक असणारे नशेसाठी वापरण्यात येणारे औषधी दुकानात विक्री करताना आढळल्याप्रकरणी औषधी दुकानदार व विक्री प्रतिनिधी अशा दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने ही धडक कारवाई केली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमळनेर शहरातील नगरपालिका व्यापारी संकुलात सुजय अधिकार पाटील (२६, रा. शिरपूर रोड, हशिमजी कॉम्प्लेक्स, अमळनेर) यांचे राजमुद्रा मेडिकल हे दुकान आहे. त्याच्या दुकानात मोठ्या प्रमाणावर नशा येणारा औषधीसाठा असल्याचे तपासणी अहवालात आढळून आले. अलफ्रासेफ ०. ५ हे ५४४ रुपयांचे टॅबलेट मिळून आले आहे.
अन्न व औषध निरीक्षक सोमनाथ मुळे, सहआयुक्त अनिल माणिकराव, औषध निरीक्षक गजानन धिरके यांनी १९ जुलै रोजी सकाळी या मेडिकलवर छापा टाकला. त्यात अल्प्रासेफ नावाच्या २२० गोळ्या आढळल्या. गोळ्या नशेसाठी वापरण्यात येतात. दुकानदाराने गोळ्यांची विक्री अथवा वापराबाबत काहीच पुरावे दिले नाहीत. या गोळ्या त्याने विक्री प्रतिनिधी चतुर (पूर्ण नाव गाव माहिती नाही) याचेकडून घेतल्याचे सांगितले.
औषध निरीक्षक सोमनाथ मुळे यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसात दुकान मालक सूरज पाटील आणि विक्री प्रतिनिधी चतुर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दोन्ही आरोपी फरार आहेत. तपास पोलिस उपनिरीक्षक अनिल भुसारे करीत आहेत.