जामनेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील शहापूर येथे नकली नोटा बाजारात आणणाऱ्या शेख फारुख याचा साथीदार मोहसीन खान याला जामनेर पोलिसांच्या पथकाने नंदुरबार जिल्ह्यात जाऊन बुधवारी रात्री अटक केली आहे. त्याला गुरुवारी न्यायालयात हजर केले असता, त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करण्याच्या बदल्यात त्यांना ५०० च्या नकली नोटा वितरित करणारा फारुख शेख नवाब शेख याला एलसीबीच्या पथकाने ३१ ऑक्टोबर रोजी शहापूर येथून अटक केली होती. त्याच्याकडून २६ हजार ५०० च्या नकली नोटा व दुचाकी जप्त केली होती. फारुख नंदुरबार येथील दोन जणांच्या संपर्कात होता तसेच गुजरात येथून नकली नोटा आणतो अशी माहिती पोलिसांना होती, त्यानुसार पोनी. प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राजेश काळे, जयसिंग राठोड, सचिन पाटील, अमोल घुगे, पांडुरंग पाटील, अमोल वंजारी यांच्या पथकाने मोहसीन खान भिकन खान उर्फ काल्या यास नंदुरबार येथून ताब्यात घेण्यात आले.