शिवसेना ठाकरे गटाचे जळगावच्या अधिष्ठातांना निवेदन
जळगाव (प्रतिनिधी) :- नांदेड, छत्रपती संभाजीनगर, नाशिक सारखे रुग्णांच्या मृत्यूंची प्रकरणे जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात होऊ नये यासाठी प्रशासनाने काळजी घ्यावी अन्यथा आरोग्य यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे जीव गेल्यास प्रशासनाला सोडणार नाही असा इशारा शिवसेना ठाकरे गटातर्फे देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन प्रभारी अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे यांना देण्यात आले.
सध्या महाराष्ट्र राज्यात सरकारी रुग्णालयात खाटा, कर्मचारी आणि आवश्यक औषधीचा तुटवडा असल्याने मृत्यू होत आहे. हे सत्य असेल तर गंभीर बाब आहे. संवेदनाशून्य सरकार व झोपलेल्या आरोग्य यंत्रणेमुळे महाराष्ट्र राज्यमधील दररोज निष्पाप जीव जात आहे. नांदेड, छत्रपती संभाजी नगर, भूम, नाशिक, गडचिरोली येथे दोन दिवसात प्रशासनाच्या बेपर्वाईमुळे मृत्यू झाले आहेत. याची दखल मुंबई उच्च न्यायालयाने घेऊन सुमोटो दाखल करून घेतली आहे.
तरी सरकारी रुग्णालयात आर्थिक तरतूद वाढवावी. मृत्यू दर कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्यात. वैद्यकीय शिक्षण खात आणि सार्वजनिक आरोग्य विभाग एकत्र करून एकच मंत्री करावे. औषध साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध ठेवावा. रुग्णालयातील रिक्त जागा त्वरित भरून रुग्णसेवा बळकट करावी. एमआरआय मशीन उपलब्ध करावी, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. निवेदन देताना जळगाव लोकसभा सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे, धरणगावचे माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, प्रमोद घुगे आदी उपस्थित होते.