नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी नुकतेच जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर गेले होते. श्रीनगर येथे काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांशी संवादही साधला. पण, राहुल गांधी थांबले होते, तिथपासून केवळ ५०० मीटरवर बॉम्ब हल्ला झाल्याचे सांगितले जात आहे. यावरून काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शंका उपस्थित केली आहे. राहुल गांधी काश्मीरला गेल्यावरच बॉम्बस्फोट कसा झाला? राहुल गांधींना संपवण्याचा कट तर नाही ना, असा खळबळजनक आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

स्वातंत्र्य लढ्यात प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी ‘व्यर्थ न हो बलिदान’ हा कार्यक्रम हुतात्मा स्मारकात घेण्यात आला. यावेळी पटोले बोलत होते. कार्यक्रमास राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना नाना पटोले यांनी राहुल गांधींच्या सुरक्षेसंबंधी प्रश्नचिन्ह उपस्थित करत केंद्र सरकारवर निशाणा साधला.







