पुणे (वृत्तसंस्था) ;- केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर त्यावरून राजकीय चर्चा आणि दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. मंत्रिमंडळ विस्तारानंतर काँग्रेसकडून त्यावर खोचक टीका करण्यात आली होती. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यासंदर्भात भाजपावर तिखट शब्दांमध्ये टीका केली होती. “मंत्रिमंडळ विस्तार करून काहीही फरक पडणार नाही. नुसते डबे बदलून फायदा नाही, इंजिन बदलायला हवं”, असं नाना पटोले म्हणाले होते. तसेच, मंत्री बदलण्याऐवजी थेट पंतप्रधानच बदलायला हवेत, अशी देखील भूमिका नाना पटोले यांनी मांडली होती. त्यावर आता भाजपाकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘पप्पू’ म्हटलं आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात बोलताना नाना पटोले यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. “नाना पटोले हे पप्पू आहेत. केंद्रात जसे एक पप्पू आहेत, तसेच महाराष्ट्रात देखील एक पप्पू आहेत. ते त्यांच्या तोंडाला येईल ते बोलत असतात”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. त्यामुळे आता यावरून राज्यात कलगीतुरा पाहायला मिळू शकतो.