गडचिरोली (वृत्तसंस्था ) – हत्या, जाळपोळ, चकमक अशा नक्षली कारवायांमध्ये सक्रिय सहभागी असलेले दोन कुख्यात नक्षलवादी पोलिसांच्या हाती लागले आहेत. सनिराम ऊर्फ शंकर नरोटे (24) आणि समुराम ऊर्फ सूर्या नरोटे (22) अशी त्या दोघांची नावे आहेत. शासनाने एकावर आठ तर दुसऱ्यावर दोन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
गडचिरोलीतील धानोरा तालुक्यात पोलिसांकडून नक्षलविरोधी मोहीम राबविली जात असताना पोमके सावरगाव परिसरात दोन व्यक्ती संशयास्पद फिरताना आढळून आले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता दोघेही नक्षलवादी असल्याचे निष्पन्न झाले. सनिराम याच्याविरोधात आठ तर समुराम याच्यावर शासनाने दोन लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. दोघेही गेल्या अनेक वर्षांपासून नक्षलवादी संघटनेमध्ये कार्यरत होते. पोलिसांच्या या कारवाईमुळे नक्षलवादी संघटनेला धक्का बसला आहे.
दरम्यान, दोघा नक्षलवाद्यांना पोलिसांनी अटक केली असतानाच दोघा नक्षलवाद्यांनी पोलिसांकडे आत्मसमर्पण केले. अनिल ऊर्फ रामसे कुजूर (26) आणि रोशनी पल्लो (30) अशी त्या दोघांची नावे आहेत.