जळगाव शहरातील घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील मोहन नगर येथील २९ वर्षीय तरुणाने नैराश्यातून मेहरूण तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सायंकाळी समोर आली. दिवसभर शोधकार्य सुरू राहिल्यानंतर सायंकाळी उशिरा त्याचा मृतदेह तरंगताना आढळला. एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
विनय अशोक देशमुख (वय २९, रा.मोहन नगर, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याचे शहरात मोहाडी रोड येथे झेरॉक्सचे दुकान आहे.तर त्याचे वडील अडावद येथील जिल्हा परिषद शाळेत माध्यमिक शिक्षक आहेत. गेल्या काही दिवसांपासून विनय नैराश्यात होता, अशी माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली आहे.(केसीएन)गुरुवारी सकाळी तो नेहमीप्रमाणे कामावर गेला असेल असे कुटुंबीयांना वाटले. मात्र, तो दुकानावर पोहोचला नसल्याचे कळताच कुटुंबीयांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली.
शोध घेत असताना विनय मेहरूण तलावावर गेल्याची माहिती मिळाली. तलावाच्या परिसरात त्याची दुचाकी आढळून आली. यामुळे त्याने तलावात उडी घेऊन आत्महत्या केली असावी, असा संशय पोलिसांना आला. तात्काळ कुटुंबीयांनी एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दिवसभर शोध मोहीम सुरू केली. मात्र विनयचा शोध लागला नव्हता. अखेर, सायंकाळी सात वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह तलावात तरंगताना आढळला. त्यानंतर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आला, जिथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे देशमुख कुटुंबाने एकच आक्रोश केला. एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने मोहन नगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.