नैराश्यातून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
जळगाव शहरातील मयूर कॉलनी येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील पिंप्राळा भागात मयुर कॉलनीत राहणाऱ्या वीस वर्षीय तरूणाने घरात कुणीही नसतांना राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी १ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास उघडकीला आली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दुर्गेश भरत बारी (२०, रा. मयूर कॉलनी, पिंप्राळा परिसर, जळगाव) असे मृत तरूणाचे नाव आहे. त्याचे वडील भरत बारी हे होमगार्ड असून इतर वेळी रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करतात. नेहमीप्रमाणे शुक्रवारी १ सप्टेंबर रोजी सकाळी दुर्गेशचे वडील कामावर निघून गेले. त्याची आई कविता ह्या नातेवाईकांकडे गेल्या होत्या तर बहिण नंदीनी ही क्लासला गेली होती. त्यावेळी दुर्गेश हा घरी एकटाच होता. दुपारी १२ वाजेच्या नंतर त्याने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. दुपारी एक वाजता बहिण नंदिनी ही खाजगी शिकवणीमधून घरी आली तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता.
बराच वेळ दरवाजा ठोकून आवाज दिला. परंतू आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. शेजारी राहणाऱ्या नागरीकांच्या मदतीने दरवाजा उघडला तर दुर्गेशने गळफास घेतल्याचे दिसून आले. भावाला पाहताच बहिण नंदिनी हिने हंबरडा फोडला. त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्यास मयत घोषीत केले. याप्रकरणी रामांनद नगर पेालीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्या करण्याचे कारण समजून आले नाही. त्याच्या पश्चात आई, वडील, मोठी बहीण असा परिवार आहे. तो बारावी इयत्तेत शिक्षण घेत होता.