जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील कुसुंबा येथील १९ वर्षीय युवकाने राहत्या घराच्या वरच्या मजल्यावर गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी १७ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तेजस धोंडू पाटील (वय-१९) रा. कुसुंबा ता.जि.जळगाव असे मयत युवकाचे नाव आहे. कुसुंबा येथे तेजस पाटील हा आईवडील आणि लहान बहिण यांच्यासह राहायला असून त्याच्या वडिलांचे गॅरेजचा व्यवसाय आहे. तेजसचे आयटीआय झाल्याने तो वडीलांना गॅरेजच्या व्यवसायात मदत करत होता. शनिवारी १६ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता तेजसने आईवडील आणि बहिण यांच्यासोबत जेवण केले. झोपण्यासाठी ते वरच्या मजल्यावरील पत्र्याच्या खोलीत गेला. दरम्यान, मध्यरात्री त्याने सुताची दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही.
सकाळी वडील धोंडू पाटील हे मुलाला उठविण्यासाठी गेले असता मुलाने गळफास घेतल्याचे पाहून त्यांना धक्काच बसला. यानंतर आरडाओरड केल्यानंतर शेजारी राहणाऱ्या ग्रामस्थांनी धाव घेतली. एमआयडीसी पोलीसांना कळविण्यात आले. त्यांनी मृतदेह खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. यावेळी नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती. घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो. कॉ. सदाब सय्यद करीत आहे.