राष्ट्रीय हरित सेना, ग्रीन सिटी फाउंडेशनचा पुढाकार
जळगाव ( प्रतिनिधी ) – पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा आणि अभिनव उपक्रम जळगावात राबवण्यात आला आहे. शहरातील संत सावता नगर परिसरात ग्रीन सिटी फाउंडेशन जळगाव, राष्ट्रीय हरित सेना, नूतन मराठा विद्यालय एनसीसी विभाग, जळगाव शहर महानगरपालिका, संत सावता माळी बहुउद्देशीय संस्था, आणि सामाजिक वनीकरण विभाग जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तब्बल ११११ रोपांचे रोपण करून ‘ऑक्सिजन पार्क’ तयार करण्यात आले आहे.
या उपक्रमासाठी गट नंबर ३१२/३ तसेच इतर तीन खुल्या जागांची निवड करण्यात आली. या ठिकाणी लिंब, शिसम, करंज, वड, पिंपळ, आणि काशीद यांसारख्या विविध प्रजातींची रोपे लावण्यात आली. या वृक्षारोपणामुळे शहराच्या हरित क्षेत्रात मोठी भर पडणार असून, पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होईल. यावेळी लेफ्टनंट कर्नल अश्विन वैद्य, नूतन मराठा विद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख, सुभेदार मेजर सुरेश कुमार, सुभेदार रामकिशन, माजी नगरसेवक डॉ. चंद्रशेखर पाटील, ग्रीन सिटी फाउंडेशनचे विजय वाणी, राष्ट्रीय हरित सेनेचे प्रवीण पाटील, नूतन मराठा एनसीसी विभाग प्रमुख प्रा. लेफ्टनंट शिवराज पाटील, संत सावता माळी बहुउद्देशीय संस्थेचे वसंतराव पाटील, भाजप मंडलाध्यक्ष शक्ति महाजन, सामाजिक कार्यकर्ते राहुल लोखंडे, साई मोरया संस्थेचे अध्यक्ष उमाकांत जाधव, आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमात परिसरातील नागरिक आणि पर्यावरण प्रेमींनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला.