नागपूर ( प्रतिनिधी ) :- खेळताना २ वर्षांचा मुलगा बोअरवेलमध्ये पडल्याची घटना ९ रोजी घडली असून त्याला गावकऱयांनी मिळून सुखरूप बाहेर काढल्याची थरारक घटना रामटेक तालुक्यातील शिवणी भोंडकी येथे घडली.
नवघान देवा दोंडा (वय २) असे या बाळाचे आहे. नवघानचे वडील गुरे चारण्याचे काम करतात. ते शिवारात जनावरे चारत होते. त्यांच्यापासून काही अंतरावर छोटीछोटी मुले खेळत-बागडत होती. खेळता खेळता शेतातील एका बोअरवेलच्या खड्ड्यात चिमुकला नवघान पडला. त्यामुळे इतर मुले रडायला लागली. मुलांचा रडण्याचा आवाज ऐकून वडील धावपळ करीत घटनास्थळी पोचले. हे दृश्य पाहून आई-वडिलांनी तर हंबरडाच फोडला.
गावातील क्रिष्णा पाटील, यादोराव शेंडे, शंकर शेंडे, महादेव पाटील, अमोल वैद्य, अक्षय गभणे ही मंडळी लगबगीने घटनास्थळावर पोहोचली. बोअरवेलला पाणी न लागल्याने शेतकऱ्याने तो खड्डा तसाच उघडा ठेवला होता. बाळास बाहेर काढण्यासाठी गावकऱ्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू झाले.
५० फूट खोलवर असलेल्या बोअरवेलच्या खड्ड्यात दोर टाकला. बाळास दोर पकडण्याच्या सूचना देण्यात आल्या. अखेर मोठ्या शिताफीने बाळास सुखरूप बाहेर काढण्यात आले. अखेर बाळास सुखरूप बाहेर काढण्यास यश आलेले पाहून गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.