परळी (वृत्तसंस्था) – बहुप्रतिक्षित नगर-बीड-परळी रेल्वेमार्ग लवकरच मार्गी लागणार आहे. या रेल्वे मार्गाच्या कामाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी ट्विट करून त्याची माहिती दिली आहे. तसेच हा निधी दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांचे आभारही मानले आहेत.
पंकजा मुंडे यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकारने शंभर कोटी मंजूर केले. कामाला आणखी गती येणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री पियुष गोयल यांचे आभार, असं ट्विट पंकजा यांनी केलं आहे. बीडकरांसाठी अतिशय महत्त्वाचा असलेला नगर-बीड-परळी रेल्वेमार्ग पूर्ण करण्यासाठी पंकजा मुंडे आणि खा.डॉ.प्रितम मुंडे सातत्याने प्रयत्न करत आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची दखल घेऊन केंद्र सरकार देखील निधीची पूर्तता करत आहे. केंद्र सरकारने केलेल्या शंभर कोटींच्या तरतुदीमुळे याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला.
या रेल्वे प्रकल्पाला गती देण्यासाठी मुंडे भगिनी वेळोवेळी पाठपुरावा करत आहेत. तसेच रेल्वेमार्गाच्या कामामध्ये त्या जातीने लक्ष देऊन आहेत. जिल्हा प्रशासन आणि रेल्वे विभागाकडून आढावा घेणे असो किंवा प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करणे असो पंकजा आणि प्रितम मुंडे यांच्या तत्परतेमुळे रेल्वेमार्गाला गती मिळत आहे. परंतु, हा रेल्वे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने देखील त्यांच्या वाट्याचा निधी उपलब्ध करून दयावा, अशी मागणी बीड जिल्ह्यातील नागरिकांमधून करण्यात येत आहे.
दरम्यान, 11 फेब्रुरवारी रोजी पंकजा यांनी या रेल्वे मार्गावर उभे राहून फोटो काढला होता. तो फोटो ट्विटही केला होता. बीड-नगर-परळी रेल्वे मार्गाचं अत्यंत कठिण स्वप्न पूर्ण होताना दिसत आहे. बीडच्या विकासासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नांची आहुती दिलीय. गोपीनाथ मुंडे यांनी आम्हाला जनसेवेचं व्रत दिलंय. ते काम आम्ही कधीही विसरणार नाही. या रेल्वे मार्गाला 527 कोटी रुपये मंजूर करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पियुष गोयल यांचे धन्यवाद, असं त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलं होतं.
परळी-बीड-अहमदनगर रेल्वेमार्गाच्या कामाचे भूसंपादनाचं काम सध्या रखडलंय. त्यामुळे या रेल्वेमार्गाचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांनी या रेल्वेमार्गासाठी पुढाकार घेतला. त्यानंतर केंद्राने 527 कोटी रुपयांची तरतूद केली. त्यापैकी 100 कोटीचा निधी आता मिळाल्याने रेल्वे मार्गाच्या कामाला गती मिळणार आहे.