मान्यवरांच्या हस्ते मंदिरांची पूजा
पाचोरा (प्रतिनिधी) : तालुक्यातील नांद्रा गावात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बैलपोळ्याच्या मुहूर्तावर सुरू झालेला हरीनाम सप्ताह नुकताच उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेल्या या परंपरेत संपूर्ण गावाने सक्रिय सहभाग घेतला.
या सप्ताहाचे वैशिष्ट्य म्हणजे याची सुरुवात कधी झाली, हे कोणालाही नक्की सांगता येत नाही, इतकी ही परंपरा जुनी आहे. तसेच, सप्ताहाचा संपूर्ण खर्च कोणत्याही एका व्यक्तीकडून घेतला जात नाही. संपूर्ण गावकऱ्यांनी एकत्र येऊन गोळा केलेल्या वर्गणीतून या सप्ताहाचे यशस्वी आयोजन केले जाते. यातून गावातील एकोपा आणि सामूहिक भावनेची प्रचिती येते.सप्ताहाच्या सात दिवसांमध्ये दररोज रात्री गावातील मंदिरांमध्ये कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या काळात संपूर्ण गावात मांसाहाराचे सेवन वर्ज्य होते. सप्ताहातील प्रत्येक दिवसाचे कार्यक्रम विधिवत पार पाडण्यात आले.
गावातील ब्राह्मणांच्या आणि ज्यांना पूजा करण्याचा मान मिळाला आहे, अशा मान्यवरांच्या हस्ते मंदिरांची पूजा करण्यात आली. सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी सकाळी ५ वाजता महादेव मंदिरावर आयोजित केलेली काकड आरती हे एक नयनरम्य दृश्य होते. या वेळी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रात्री काल्याचे कीर्तन झाले आणि त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करून सप्ताहाची सांगता करण्यात आली.