धुळे (वृत्तसंस्था) – तापी नदीच्या पुलावरून उडी घेत एकाच कुटुंबातील तीन जणांनी आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. परिसरातील एका तरुणांनं तिघांना नदीत उडी घेतान पाहिल्यानं ही घटना उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून घटनेचा तपास सुरू केला आहे. आत्महत्येच्या नेमक्या कारणाचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे.

नथा बुधा वाघ, पत्नी सखूबाई आणि गोपाल असं आत्महत्या करणाऱ्या तिघांची नावं असून ते धुळे जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील रहिवासी आहेत. संबंधित तिघांनी गुरुवारी शिरपूर तालुक्यातील गिधाडे येथील एका पुलावरून तापी नदीत उडी घेत आत्महत्या केली आहे. घटनास्थळी पोलिसांना कावासाकी दुचाकी, पाण्याची बाटली, किटकनाशकं आढळली आहे. कौटुंबीक कारणातून त्यांनी आत्महत्या केली असावी, असा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
नथा बुधा वाघ, पत्नी सखूबाई आणि गोपाल हे तिघं आपल्या राहत्या घरातून बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. दरम्यान गुरुवारी संबंधित तिघांनी तापी नदीवरून उडी घेत आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. दोन पुरूष आणि एका महिलेला पुलावरून उडी घेताना, परिसरातील एका तरुणानं पाहिलं होतं. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिरपूर आणि शिंदखेडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.







