मुंबई (वृत्तसंस्था) – करोनाचं संकट दिवसेंदिवस वाढतच आहे, पण केंद्रातून दररोज वेगवेगळी वक्तव्ये येत आहेत. प्लाझ्मा थेरेपीबाबत संभ्रम आहे. लॉकडाऊन करायचं की अनलॉक करायचं? केंद्राने नीट गाइडलाइन बनवली नाही, त्यांनी राज्यांवर जबाबदारी ढकलली. त्यामुळे राज्य सरकारे आपापल्या परीने निर्णय घेत आहेत, असे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, करोनाचे संकट मोठे असून त्याच्याबाबत कुणालाच अंदाज येत नाही. केंद्राने आयसीएमआरने 15 ऑगस्टला लस बाजारात आणण्याचं सांगितलंय, पण मला आश्चर्य वाटतंय, हे नेमकं कसं होणार? धोरण काय? केंद्रात ताळमेळ नाही. तसेच आरोग्य आणि आर्थिक हे वेगळे विषय, जीएसटीमुळे राज्याचे सर्व सोर्स बंद झाले आहेत. राज्यांना फार मोठ्या प्रमाणात कर्ज घेता येत नाही,
केंद्राने मदत केली नाही तर राज्यांवर मोठं संकट ओढावेल. अशा परिस्थितीत केंद्रानेही कर्ज काढण्याशिवाय पर्याय नाही, असेही त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्रात 31 जुलैपर्यंत लॉकडाऊनचा निर्णय कसा झाला याबाबत संभ्रम आहे. थेट महिनाभर लॉकडाऊन वाढवला. कॉंग्रेस नेते आणि अन्य पक्षांचे नेतेही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत आहेत. जिथे रुग्ण वाढले तिथे लॉकडाऊन ठीक आहे, हा निर्णय कसा झाला याबाबत चर्चा होईल, असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडीतील कुरबुरीवर भाष्य केले.







