नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीत 23.48 टक्के नागरिकांमध्ये करोनाच्या अँटीबॉडीज असल्याचे एका सर्वेक्षणात समोर आले आहे. याचा अर्थ एवढ्या लोकांना करोना होऊन गेला आहे. यात सहभागी झालेल्या बहुतांश जणांना कोणतीही लक्षणे दिसली नाहीत.
बाधा झालेल्या अनेक जणांना करोनाची लक्षणेही दिसत नाहीत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या निवेदनात स्पष्ट केले आहे. या सर्वेक्षणासाठी रक्ताचे एकूण 21 हजार 387 नमुने घेण्यात आले होते.
देश या साथीच्या सावटाखाली सहा महिने आहे. मात्र, या कालावधीत केवळ 23.84 टक्के लोकांना करोनाची बाधा झाली आहे. यातील अनेक नमुने हे दाट लोकवस्तीच्या भागातील आहेत, असे या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. हे सर्वेक्षण दिल्ली सरकार, राष्ट्रीय साथ नियंत्रण केंद्र आणि केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने घेण्यात आले.
यापूर्वी भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने (आयसीएमआर) आणि एनसीडीसी यांनी असा स्वरूपाचे सर्वेक्षण विनाप्रतिबंधित क्षेत्रातील 83 जिल्ह्यात घेतले होते. त्यातील 65 जिल्ह्यांमध्ये 0. 73 टक्के जणांना करोना होऊन गेला होता. अशा देशव्यापी सर्वेक्षणाचे काम सुरू असल्याचे अलीकडेच सरकारने जाहीर केले होते.
या सर्वेक्षणाचे निकाल पूर्ण तपशील हाती येईपर्यंत घाईने जाहीर करू नयेत, असा इशारा साथरोग तज्ज्ञांनी दिला आहे. विशेषत: लोकसंख्येतील बाधितांचे प्रमाणाचा तपशील त्यासाठी आवश्यक आहे. या विषाणूची बाधा सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ राजधानीत होत आहे. तसेच त्याच्या प्रसाराला कोणतेही ठराविक प्रारूप नाही.
राज्याच्या सर्व भागातही तो एक समान पसरला नाही. त्यामुळे संसर्गाची सरासरी एवढ्याच मर्यादित दृष्टिकोनातून त्याकडे पाहता येईल, असे राजीव गांधी सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी, थिरूवनंतपूरम येथील तज्ज्ञ डॉ. लिपी जोसेफ यांनी म्हटले आहे.
हे सर्वेक्षण दिल्लीच्या 11 जिल्ह्यांत 27 जून ते 10 जुलै या काळात घेण्यात आले. त्यावेळी सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांना त्याची पूर्ण माहिती देण्यात आली होती. त्याची लिखित परवानगी घेण्यात आली होती. अँटीबॉडिजच्या तपासणीसाठी इलिसा टेस्ट किट वापरण्यात आले होते.







