लखनौ (वृत्तसंस्था) – देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच आज उत्तर प्रदेशामध्ये एका दिवसातील सर्वाधिक कोरोना मृत्यू नोंदवण्यात आलेत. राज्यात आज ४६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून यामुळे एकूण मृत्यूंची संख्या ११९२ इतकी झाली आहे.
राज्यातील कोरोना परिस्थितीबाबत बोलताना अतिरिक्त मुख्य सचिव अमित मोहन प्रसाद यांनी, ‘ उत्तर प्रदेशात आज १,९१२ नवे कोरोनाग्रस्त सापडले आहेत. यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ५१,५६० इतकी झालीये. आतापर्यंत ३०,८३१ कोरोना रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून १९,१३७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.’ अशी माहिती दिली.
दरम्यान, काल उत्तर प्रदेशामध्ये १,९१३ नव्या रुग्णांसह एकूण आकडा ४९,२४७ वर पोहोचला होता. आज १,९१२ रुग्ण आढळल्याने राज्यामध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येने अर्ध्या लाखाचा टप्पा ओलांडला आहे. याबाबत अधिक माहिती देताना प्रसाद यांनी, रविवारी राज्यामध्ये ४३,४०१ कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून राज्यातील एकूण कोरोना चाचण्यांची संख्या १५ लाखांवर पोहचल्याचे सांगितले.
‘उत्तर प्रदेशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची ओळख पटण्यासाठी आरोग्य सेतू या मोबाईल ऍप्लिकेशनचा फायदा होत आहे. लोक या ऍपद्वारे कोरोना लक्षणं तपासत असून आरोग्य सेतू ऍपच्या माध्यमातून मिळालेल्या सतर्कता संदेशांमधून आतापर्यंत ३.५० लाख लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.’ अशी माहिती देखील प्रसाद यांनी दिली.
उत्तर प्रदेशात ४७,००० कोरोना मदत केंद्र उभारण्यात आली असून येथे तापमान व शरीरातील ऑक्सिजन मोजण्यासाठी आवश्यक असलेली उपकरणे उपलब्ध करून देण्यात आल्याचे प्रसाद म्हणाले.