पुणे (वृत्तसंस्था) – राज्यात मुंबईमध्ये कोरोना वाढीचा दर स्थिरावला असला तरी पुण्यामध्ये कोरोना रूग्ण सध्या झपाट्याने वाढत आहेत . पुणे शहरात काल ( १७जुलै ) नव्याने १ , ७०५ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकूण संख्या ३४ , ०४० झाली आहे . पुण्यात रूग्णसंख्या वाढत असताना हाॅस्पिटल्समध्ये नविन रूग्णांसाठी बेड शिल्लक नसल्याच्या तक्रारी येत आहेत . या पार्श्वभूमीवर कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयात जागा मिळावी , यासाठी आता अत्यंत कडक पाऊल उचलण्यात आले आहे . पुण्यात खाजगी रूग्णालयांमध्ये बेड्स अडवून बसलेल्या asymptotic रुग्णांना घरी पाठवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत .
मिळालेल्या माहितीनुसार पुण्यामध्ये सामान्य कोरोना रुग्णांना उपचार मिळत नाहीत तर दुसरीकडे खासगी रूग्णालयांमधून अतिसौम्य लक्षणं असलेले रूग्ण अकारण बेड्स अडवून बसल्याच्या तक्रारी आहेत . म्हणूनच खाजगी रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित म्हणून उपचार घेत असलेल्या तथापी , कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांचे समुपदेशन करुन त्यांना घरी पाठविण्यात यावे , असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी काढले आहे .
जे रुग्ण कोरोनाबाधित म्हणून उपचार घेत आहेत आणि कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत किंवा कोणतीही लक्षणे नाहीत , मात्र असे रुग्ण घरी जाण्यास नकार देत असतील तर त्यांची यादी महानगर पालिका प्रशासनाकडे पाठविण्यात यावी , असंही जिल्हाधिकारी राम यांनी कळवले आहे .
खाजगी रुग्णालयांमधील कोरोनाबाधित रुग्णांची माहिती घेण्यासाठी जिल्हा स्तरावर तपासणी पथक स्थापन करण्यात आले असून या पथकामार्फत तपासणी करण्यात येणार आहे . जर कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेले किंवा सौम्य लक्षणे असलेले रुग्ण खाजगी रुग्णालयात आढळून आले तर संबंधित रुग्णालयाच्या प्रशासनावर साथरोग प्रतिबंधक कायदा तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार , कार्यवाही करण्यात येईल , असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे .







