नवी दिल्ली (वृत्तसंस्था)-मीरत: उत्तर प्रदेशात मीरत जिल्ह्यात पोलिसांबरोबरच्या चकमकीमध्ये आज आणखी एक गुन्हेगार मारल गेला. या चकमकीमध्ये एक पोलीस उपनिरीक्षक जखमी झला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दीपक सिद्धू असे या गुन्हेगाराचे नाव असून तो मीरतमधील ‘मोस्ट वॉन्टेड’ गुन्हेगार होता. त्याच्या अटकेसाठी 50 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. बुधवारी रात्री त्याच्या अटकेसाठी केलेल्या कारवाईदरम्यान झालेल्या चक्मकीत तो ठार झाला.
त्याच्या ठावठिकाण्याविषयी माहिती मिळताच स्थानिक पोलिसांना सतर्क करण्यात अले. सिद्धू आणि त्याच्या एका साथीदाराचा पाठलाग करण्यात आला. मात्र त्यांनी पोलिसांवर गोळीबार केला.
प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये सिद्धू जखमी झाला. तर त्याचा साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाला. चकमकीदरम्यान एक पोलीस उपनिरीक्षक जखमी झाला. जखमी झालेल्या दोघांनाही जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान सिद्धू मरण पावला, असे वरिष्ठ पोलीस अधीक्षक अजय कुमार सहानी यांनी पत्रकारांना सांगितले.
सिद्धू कुख्यात गुन्हेगार होत आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील विविध जिल्ह्यांमधील पोलीस त्याच्या मागावर होते. त्याच्या नावावर तब्बल दीड डझन गुन्हे होते. त्यामध्ये लूट, हत्या आणि दरोड्यासारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. चकमकीनंतर पोलीसांनी सिद्धूच्या ताब्यातून बेकायदेशीर बाळगलेले पिस्तूल जप्त केले, असे पोलिसांनी सांगितले.







