चाळीसगाव तालुक्यासह जिल्हा हादरला
चाळीसगाव (प्रतिनिधी) : भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांच्यावर बुधवार दि. ७ जानेवारी रोजी दुपारी हनुमानवाडी परिसरात पाच संशयित आरोपींनी गोळीबार केल्याची घटना घडली होती. यामध्ये महेंद्र मोरे हे गंभीर जखमी होऊन त्यांच्यावर नाशिक येथे उपचार सुरू होते. शुक्रवारी रात्री उपचारादरम्यान मोरेंचा मृत्यू झाला आहे. यामुळे चाळीसगाव तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
गोळीबार प्रकरणी अजय संजय बैसाणे (वय ३१ वर्षे, रा. लक्ष्मी नगर, बसस्टॅन्डच्या पाठीमागे, चाळीसगाव) यांच्या फिर्यादीवरून उददेश उर्फ गुडडू शिंदे (रा. हिरापुर), सचिन गायकवाड (रा. चाळीसगाव), अनिस शेख उर्फ नव्वा शरीफ शेख (रा.हुडको कॉलनी, चाळीसगाव), सॅम चव्हाण (रा. हिरापुर), भुपेश सोनवणे (रा. चाळीसगाव), सुमित भोसले (रा. चाळीसगाव), संतोष निकुंभ उर्फ संता पहेलवान (रा. हिरापुर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.
तसेच बैसाणे यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार पहिल्या पाच संशयितांनी गोळीबार केला तर सुमित भोसले आणि संतोष निकुंभ हे देखील या कटात सहभागी होते, असेही फिर्यादीत नमूद होते. दरम्यान, मोरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यामुळे आता संशयित आरोपींविरुद्ध खुनाचे कलम वाढवले जाणार आहे. मोरेंचा मृत्यूची वार्ता चाळीसगावात समाजात तणावात भर पडली आहे.
गोळीबार केल्यानंतर मारेकरी ज्या वाहनातून पसार झाले होते, ते वाहन पोलिसांच्या हाती लागले आहे. तर लवकरच मारेकरी देखील गजाआड करू, असे पोलिसांनी सांगितले.