मुंबई (वृत्तसंथा) – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधान परिषदेत धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर उत्तर दिले. धनगर समाज हा माझा आहे, सगळे समाज माझे, आपले सर्वांचे आहेत, त्यांना कुठेही काहीही कमी पडू देणार नाही. जोपर्यंत त्यांना कायदेशीर मान्यता मिळत नाही तोपर्यंत त्यांची जबाबदारी ही पूर्ण सरकारची आहे, असे ते म्हणाले. तसेच धनगर किंवा इतर समाजाच्या न्याय हक्कासाठी एकत्रित केंद्राकडे जाऊन त्यांना न्याय मिळवून देऊ अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी सर्व सभासदांना केली.
विधान परिषदेत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, धनगर समाजाचा हा प्रश्न पहिल्यांदाच सभागृहासमोर आलेला आहे असे नाही. गेल्या अनेक वर्षांचा हा प्रश्न आहे. या समाजाच्या अनेक पिढ्या वंचित राहिलेल्या आहेत. अनेकांनी या समाजाचे प्रश्न सोडवू म्हणत आमदारकी, खासदारकी, मंत्रीपदे भोगलेली आहेत. या विषयावर एकमेकांशी हमरीतुमरी वर न येता विषय समजून घेऊन तो विषय आपला आहे की केंद्राच्या अखत्यारीतला आहे हे समजून घ्यायला पाहिजे. आपले अधिकार किती आहेत तोही विषय समजून घेतला पाहिजे.
आपल्याला विषय सोडवायचा असेल तर पक्षाची, जाती-समाजाची लेबल बाजूला ठेऊन यासाठी काम करायाला हवे. शिवसेनाप्रमुखांनी सांगितलं होतं की प्रत्येक जातीला पोट असतं पण पोटाला जात लावू नका, सर्वांना मी विनंती करतो की आपण एकत्र येऊन धनगर किंवा आणखी समाज असेल या समाजाच्या न्याय हक्कासाठी एकत्रित केंद्राकडे जाऊ आणि हे विषय सोडवून टाकू आणि त्यांना न्याय मिळवून देऊ.