मुंबई ( प्रतिनिधी ) – जोड्या स्वर्गात नाही, तर नरकात बनतात, अशी टिप्पणी मुंबई उच्च न्यायालयाने घरगुती वादावर सुनावणीत केली. न्या सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू होती, जोडपे एकत्र राहण्यास तयार नव्हते आणि पुरुष त्याच्या पत्नीचा छळ करत हुंड्याची मागणी करत होता.
न्यायालयासमोर दोघांनी एकमेकांविरुद्ध तक्रारी केल्याचे दिसून आले. न्या एस.व्ही. कोतवाल यांनी म्हटले आहे की, पती-पत्नी एकत्र राहण्यास इच्छुक नसल्याचे तक्रारींवरून दिसून येते. सुनावणीदरम्यान संतप्त न्यायाधीश कोतवाल यांनी असेही म्हटले होते की, ‘जोड्या स्वर्गात नाही तर नरकात बनतात.’
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये महिलेने तिच्या पतीविरोधात एफआयआर दाखल केला होता. पत्नीने आरोप केला होता की, २०१७ मध्ये त्यांचे लग्न झाले तेव्हा सासरच्या लोकांनी घरातील प्रत्येक सदस्यासाठी एक सोन्याचे नाणे मागितले होते. लग्नात ती मागणी पूर्ण न झाल्याने सासरच्यांनी तिचा छळ सुरू केला. ज्या घरात ती पती आणि 3 वर्षाच्या मुलासह राहते, ते घर खरेदी करण्यासाठी तिनेही १३ लाख ५० हजार रुपये दिले होते. लोकांसमोर ती वाईट असल्याचं सिद्ध करण्यासाठी पतीने मुद्दाम अंगावर काही जखमांच्या खुणा करून महिलेने मारहाण केल्याचा बनाव केला.
पतीने तक्रारीत म्हटले आहे की, लग्नानंतर तो पत्नीला फिरायला घेऊन मॉरिशसला गेला होता. महागडा फोनही भेट म्हणून दिला होता. घरासाठी त्याने स्वतः ९० हजारांचे कर्ज घेतले होते, असा दावा त्याने केला आहे. पत्नी सतत अत्याचार करत असल्याचं काही व्हॉट्सअॅप चॅटवरून पतीने न्यायालयासमोर दाखवण्याचा प्रयत्नही केला होता. पतीला अटकपूर्व जामीन मंजूर करताना न्यायालयाने क्रॉस एफआयआर सुनावणी करूनच निर्णय घेतला जाईल, असे सांगितले.