जळगाव( प्रतिनिधी ) – शहरातील समता नगरात राहणाऱ्या एका मुलीचे फोटो अज्ञात व्यक्तीने इन्स्टाग्रामवर बनावट खाते तयार करून अपलोड करून तिची बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बुधवार ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जळगाव शहरातील समता नगरात राहणाऱ्या एका मुलीचे फोटो अज्ञात व्यक्तीने इन्स्टाग्रामवर बनवट खाते तयार करून अपलोड केले. तसेच फोटोच्या खाली कमेंट करून तिची बदनामी केल्याचा प्रकार मंगळवारी ४ ऑक्टोबर रोजी उघडकीला आला. दरम्यान, हे फोटो अज्ञात व्यक्तीने कुठूनतरी चोरून अपलोड केल्याचे उघडकीस आले आहे. पिडीत मुलीने तिच्या वडीलांसोबत बुधवारी ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहे.