अमळनेर शहरातील घटना
अमळनेर (प्रतिनिधी)- मुलांना पळवून नेण्याच्या संशयावरून तांबेपुरा परिसरात तिघांना पब्लिक मार देऊन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची घटना ३० रोजी दुपारी साडे तीन चार वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान,पोलिसांनी त्यांची अधिक चौकशी करून त्यांच्या कुटुंबासमक्ष त्यांना सोडून दिल्यानंतर विना परवानगी गावात वस्तू विक्री करीत असल्याने गाव सोडण्याचे निर्देश दिले आहेत.
तांबेपुरा भागात दि. ३० रोजी दुपारी साडे तीन चार वाजेच्या सुमारास जडी बुटी व खडे, रत्न विकणारे तिघे फिरत होते. तांबेपुरा भागात विप्रो कंपनीच्या शेजारी कामासाठी परराज्यातील कामगार कुटुंब आलेले आहेत. त्या कुटुंबातील लहान मुले खेळत असताना तिघांनी मुलांना ओढण्याचा प्रयत्न केला असा संशय कुटुंबांना आल्याने आरडाओरड झाली. परिसरातील लोकांनी तिघांना चोप दिला. पोलिसांना माहिती कळवताच पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र निकुंभे, सुनील पाटील, मिलिंद सोनार, विनोद संदांनशीव, संजय सोनवणे, होमगार्ड पूनम हटकर घटनास्थळी पोहचले.
तिघांना अमळनेर पोलीस स्टेशनला आणण्यात आले. सखोल चौकशी केल्यानंतर सत्य दिसून आले. हे तिघे आपल्या कुटुंबासह गजानन महाराज मंदिराजवळ बऱ्याच दिवसापासून जडी बुटी व खड्यांचे रत्न विक्रीसाठी आलेले आहेत. त्यांचे कुटुंब पोलीस स्टेशनला आले. पोलिसांनी त्यांचे आधारकार्ड तपासून सखोल चौकशी केली आणि कुटुंबासह त्यांना सोडण्यात आले. मात्र त्यांनी, शहरात आल्यावर पोलिसांना कळवायला पाहिजे होते. संशयामुळे अधिक अनर्थ घडू नये म्हणून त्यांना गाव सोडण्याचे निर्देश पोलिसांनी दिले आहेत.