केळीच्या बागेतील लाखो रुपयांची गांजा शेती उद्धवस्त!
मुक्ताईनगर (प्रतिनिधी):- मुक्ताईनगर तालुक्यातील माणगाव शिवारात केळीच्या बागेआड लपून अवैधपणे सुरू असलेली गांजाची मोठी लागवड जळगाव स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि मुक्ताईनगर पोलिसांनी बुधवारी (१९ नोव्हेंबर) दुपारी २ वाजता संयुक्त कारवाई करून पूर्णपणे उद्ध्वस्त केली आहे. या कारवाईमुळे तालुक्यातील अवैध अंमली पदार्थांच्या गोरखधंद्याला मोठा धक्का बसला आहे.
LCB ला मिळाली गोपनीय माहिती
माणगाव शिवारात मोठ्या प्रमाणावर गांजाची शेती सुरू असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळाली होती. माहितीची खातरजमा होताच, गायकवाड यांनी तातडीने पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुक्ताईनगर पोलिसांना सोबत घेऊन बुधवारी दुपारी २ वाजता माणगाव शिवारातील एका शेतावर धाड टाकली.
केळीच्या गर्दीत लपविलेली होती लागवड
यावेळी पोलिसांना धक्कादायक बाब आढळली. केळीच्या झाडांच्या दाट गर्दीमध्ये अत्यंत नियोजनबद्ध आणि लपून गांजाच्या झाडांची अवैध लागवड करण्यात आली होती. गांजाची ही झाडे मोठ्या प्रमाणावर वाढलेली होती आणि त्यांची अंदाजित किंमत लाखो रुपयांच्या घरात असू शकते.पोलिसांनी कोणतीही दिरंगाई न करता, लागवड केलेली गांजाची सर्व झाडे तत्काळ पूर्णपणे उध्वस्त केली आणि पुरावा म्हणून काही नमुने जप्त केले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील या पथकाने अत्यंत गुप्तता पाळून ही यशस्वी कारवाई केली. गांजाची लागवड करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याला तात्काळ अटक करण्याची कार्यवाही मुक्ताईनगर पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.








