मुक्ताईनगर ( प्रतिनिधी ) – येथील नगरपंचायतीच्या भाजपच्या नगराध्यक्ष जातवैधता प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर न करू शकल्याने जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत यांनी त्यांना अपात्र घोषित केले आहे आपण जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयाला आव्हान देणार असल्याचे त्यांनी सांगितले .
जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे मुक्ताईनगर तालुक्यात खळबळ उडाली आहे. मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवणुकीत अनुसूचित जमातीसाठी आरक्षित जागेवरून नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या भाजपच्या नजमा तडवी यांच्या विरोधात मुक्ताईनगर येथील गिरीश रमेश चौधरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती निवडणुकीत निवडून आल्यानंतर सहा महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे मुक्ताईनगरच्या नगराध्यक्षाना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सोमवारी अपात्र घोषित केल्याने मुक्ताईनगरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
याबाबत नजमा तडवी यांनी सांगितले की, आपल्याकडे जातवैधता पत्र असून मी नंदुरबार येथे समितीकडे कागदपत्र सादर केले होते मात्र जात पडताळणी समितीने विहित मुदतीच्या दोन महिने उशिरा मला जातवैधता प्रमाणपत्र दिले माझ्याबद्दल राजकारण होत असल्याचा आरोपही त्यांनी केला जातवैधता प्रमाणपत्र सादरीकरणाचा कालावधी दीड वर्षाचा वाढीव असून तसे राज्य सरकारने जारी केलेले परिपत्रक आपल्याकडे आहे मी या निकालाविरोधात अपिलात जाणार असल्याचेही नजमा तडवी यांनी सांगितले.