मुक्ताईनगर ( प्रतिनिधी ) – येथील पोलीस निरिक्षक राहूल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आज पहाटे धडक कारवाई करून सात ट्रॅक्टर्स पकडून वाळू तस्करांना दणका दिला आहे.
तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी होत असल्याने कारवाई करण्यात यावी अशी मागणी होती. काही ट्रॅक्टर्सच्या माध्यमातून वाळूची तस्करी करण्यात येत असल्याची माहिती मुक्ताईनगरचे पो नि राहूल खताळ यांना मिळाली होती. त्यांनी पथक तयार करून आज पहाटे तीन ते सहाच्या दरम्यान धडक कारवाई केली.
या पथकाने शहरातील बर्हाणपूर रोडपासून सुरूवात करून पिंप्रीनांदू येथील पुलापर्यंत सात ट्रॅक्टर्स ताब्यात घेतले चालकांनाही अटक करण्यात आली आहे. दुपारपर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. ही कारवाई पो नि राहूल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय शेवाळे आणि त्यांच्या सहकार्यांनी केली. या कारवाईमुळे वाळू तस्करांना जोरदार हादरा बसला आहे.