आता प्रयत्नानंतर बिबट्या जेरबंद
मुक्ताईनगर (प्रतिनिधी):- शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या शासकीय विश्रामगृह परिसरात आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास अचानक एका बिबट्याने शिरकाव केल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली. बिबट्याला पाहताच नागरिकांची मोठी धावपळ झाली असून, या घटनेमुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आज सकाळी ११ वाजता विश्रामगृह परिसरात अचानक बिबट्या दिसून आला. ही माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरताच बघ्यांची मोठी गर्दी झाली. घटनेचे गांभीर्य ओळखून मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तात्काळ वनविभागाला पाचारण केले.
वनविभागाची कुणकुण लागताच बिबट्याने विश्रामगृहाच्या मैदानाच्या दिशेने धाव घेतली. यावेळी संतप्त आणि घाबरलेल्या नागरिकांनी बिबट्याचा पाठलाग करून त्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न केला. या धावपळीत बिबट्या काहीसा जखमी झाल्याचे दिसून आले आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. त्यांनी केवळ पाहणीच केली नाही, तर बिबट्याला सुरक्षितपणे जेरबंद करण्यासाठी स्वतः नागरिकांसोबत प्रयत्न केले. प्रशासकीय यंत्रणा आणि वनविभागाला त्यांनी योग्य सूचना देऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे निर्देश दिले.
जंगलातून थेट शहरात बिबट्या घुसल्याने मुक्ताईनगरवासीयांमध्ये भीतीचे सावट आहे. शहरात पुन्हा अशा घटना घडू नयेत आणि बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. वनविभागाने शहरालगतच्या भागात गस्त वाढवावी, अशी विनंती नागरिकांनी केली आहे.









