दोन सख्या भावांना अटक, मुक्ताईनगर तालुका हादरला
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : मुक्ताईनगर शहरात एका २८ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ज्या तरुणीसोबत साखरपुडा झाला तिच्यासोबत तरुणाचे अफेअर असल्याचे संशयावरून ही घटना घडल्याचे तपासात दिसून आले आहे. दोन सख्या भावांना मुक्ताईनगर पोलिसांनी अटक केली आहे.
नगरपंचायत निवडणुकीच्या धामधुमीत घडलेल्या या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशाल गणेशगीर गोसावी (वय २८, रा.जिजाऊनगर, मुक्ताईनगर) असे मयत तरुणाचे नाव आहे. शहरातील हॉटेल वृंदावन समोरील प्लॉटिंग भागात एका मोकळ्या जागेत रविवार, २३ रोजी सायंकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. विशाल गोसावी हा गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होता. काल सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास काही नागरिकांना प्लॉटिंगच्या ठिकाणी त्याचा मृतदेह दिसला. सदर तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याचे निदर्शनास आले. नागरिकांनी तातडीने मुक्ताईनगर पोलिसांना याची माहिती दिली.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह पुढील तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. दरम्यान पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरविले. त्यानुसार, ऋषिकेश आत्माराम पवार (धनगर), आकाश आत्माराम पवार (धनगर) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आकाश पवार याचा एका तरुणीसोबत साखरपुडा झाला आहे. या तरुणीचे मयत विशाल गोसावी याचे सोबत अफेअर सुरू असल्याचा संशय आकाशला होता. त्यातून आकाशने भाऊ ऋषिकेशच्या सोबत कट रचला. विशाल गोसावी याला दारू पाजून बोदवड रस्त्यावरील बंद पडलेल्या उद्यानात नेऊन तिथे चाकूने भोसकून हत्या केली. मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल झाला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.









