जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मुक्ताई साखर कारखान्याला कधी – कधी आणि किती कर्ज दिले आहे अशा माहितीची मागणी करणारे पत्र ईडीच्या मुंबई कार्यालयाने जिल्हा बँकेला नुकतेच दिले आहे
सहकार क्षेत्रातील जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार अशा प्रकारच्या राज्यातील ४० साखर कारखान्यांना त्या-त्या जिल्ह्यातील जिल्हा बँकांनी किती आणि कधी कर्ज दिले याची माहिती ईडीने मागवली आहे अशा माहितीची मागणी करणारी पत्रे ईडीने वर्धा , सातारा , कोल्हापूर , पुणे , सांगली आदी जिल्हा सहकारी बँकांनाही दिले आहे
दुसरीकडे मात्र जळगाव जिल्ह्यात राजकीय वर्तुळात हा मुद्दा गांभीर्याने चर्चिला जातोय राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांची याआधीच भोसरी जमीन खरेदी प्रकरणी ईडीने चौकशी केली आहे त्यांच्या कन्या रोहिणीताई खडसे या जिल्हा बँकेच्या अध्यक्ष असून बँकेला ईडीची नोटीस प्राप्त झाल्याच्या चर्चेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील एका खासगी साखर कारखान्याला कर्जपुरवठासह बँकेतील इतर आर्थिक व्यवहारासंबंधात ईडीने जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला नोटीस बजावली नसून ते माहिती मागवणारे पत्र आहे .
राज्यभर ईडीची चौकशी
राज्यातील आणखी दोन साखर कारखान्यांचे व्यवहार ईडीच्या रडारवर आहेत. नंदुरबार येथील पुष्परेंद्धेश्वर आणि अमरावती येथील अंबादेवी सहकारी साखर कारखान्याची कागदपत्रं अंमलबाजवणी संचलनालयाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली आहे. ईडीने काही दिवसांपूर्वी सातारा येथील जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना जप्त केला होता. त्यानंतर आता या दोन कारखान्यांच्या व्यवहारांचीही चौकशी सुरु केली आहे.
सातारा जिल्हा बँकेने जरंडेश्वरला 96 कोटींचे कर्ज दिले असल्याच्या खुलाशाबाबत नोटीस बजावण्यात आली होती. जिल्हा बँकेने कर्ज देताना कोणत्या आधारावर दिलं, कागदपत्रांची पूर्तता नेमकी कशी केली गेली होती, कर्ज प्रकरणाची प्रोसेस नेमकी कशी झाली, ही प्रोसेस होताना नियम आणि अटींचं पालन झालं होतं का? अशा पद्धतीने ईडी तपास करु शकते.