प्रसूती कक्ष, स्वच्छता, मनुष्यबळ विषयांवर केली चर्चा
जळगाव (प्रतिनिधी) :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी तथा मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी मंगळवारी १० ऑक्टोबर रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील विविध तक्रारींबाबत अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांची भेट घेतली. तसेच रुग्णालय परिसरातील विविध विभागांची पाहणी केली. यावेळी प्रसूती कक्ष, स्वच्छता, मनुष्यबळ, दिव्यांग बोर्ड, सिटी स्कॅन आदींविषयी त्यांनी चर्चा करून समस्या सोडविण्याच्या सूचना केल्या.
मंगेश चिवटे यांच्याकडे काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी माहिती दिली. अधिष्ठाता कार्यालय, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात नागरिकांना, कर्मचाऱ्यांना वेळेवर सह्या मिळत नाही. प्रसूती कक्षात एकाच खाटेवर दोन रुग्ण असतात. तसेच, विविध वॉर्डांत अस्वच्छता भरपूर आहे. वेळेवर साफसफाई केली जात नाही. मनुष्यबळाची कमतरता असून त्याबाबत पाठपुरावा केला जाणार आहे. अशा विविध विषयांवर अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांनी आश्वासन दिल्याचे मंगेश चिवटे यांनी पत्रकारांना सांगितले.
अधिष्ठाता डॉ. ठाकूर म्हणाले की, वैद्यकीय महाविद्यालय लवकरच नवीन हबमध्ये सुरु होणार आहे. आपल्या रुग्णालयात पूर्ण जिल्ह्यातून रुग्णांची उपचारासाठी गर्दी होत आहे. ‘रेफरल’ म्हणजेच वर्ग झालेल्या रुग्णांना आपण यशस्वीपणे हाताळत असून रुग्ण बरा होण्याचा दर चांगला आहे. मृत्युदर कमी आहे. २४ तास अहोरात्र सेवा सुरु आहे. नर्सिंगसह मनुष्यबळाची कमतरता लवकरच भरून काढण्यासाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा केला आहे. तसेच, एमआरआय सुविधांसाठी जागा नाही. त्यासाठी जागा शोधत असल्याचेही त्यांनी सांगितले.