जिल्हा उद्योग केंद्राचा पुढाकार ; गतिमानता पंधरवडा घोषित
जळगाव (प्रतिनिधी) – उद्योग संचालनालयाचे विकास आयुक्त (उद्योग) दीपेंद्र कुशवाह यांनी १८ ते २ जानेवारीपर्यंत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना गतिमानता पंधरवडा घोषित केला आहे. या पंधरा दिवसांमध्ये जिल्हा उद्योग केंद्रातर्फे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेची जनजागृती मोहीम हाती घेण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती पंधरवडा १८ डिसेंबरपासून सुरू झाला आहे. या योजनेचे जास्तीत जास्त प्रस्ताव या माध्यमातून गोळा करणे, ते ऑनलाईन अर्जप्रणालीद्वारे पोर्टल भरणे, माहिती देणे आणि प्रचार करणे आदी नियोजन करण्यात येणार आहे. जिल्हा उद्योग केंद्रात नाशिक विभाग उद्योग सहसंचालक सतीष शेळके यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हा उद्योग केंद्र, खादी ग्रामोद्योग मंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळ, अण्णासाहेब पाटील महामंडळ, जिल्हा विकास ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा अग्रणी बँक व कौशल्य व उद्योजकता विकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत जास्तीत जास्त कर्ज प्रकरणे मंजुर करुन घेवुन वाटपाची कार्यवाही करावी. नवउद्योजकांनी सदर पंधरवाडयात सदर योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. असे आवाहन शेळके यांनी केले. सदर योजनेची अधिक माहितीसाठी जळगांव जिल्हा उद्योग केंद्राशी संपर्क साधावा. असे आवाहन महाव्यवस्थापक चेतन पाटील व व्यवस्थापक आर.आर.डोंगरे यांनी केले आहे.