सोमवारी शपथविधी होण्याची शक्यता
मुंबई (प्रतिनिधी) :- अखेर राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हेच विराजमान होणार असून उपमुख्यमंत्रीपदी अजितदादांसह शिवसेनेतून शंभूराज देसाई किंवा दादा भुसे यांना संधी मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. नवीन सरकारचा शपथविधी हा सोमवारी दि. २ डिसेंबर रोजी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मागील विधानसभा सदस्यांची मुदत दि. २६ नोव्हेंबर रोजी संपली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिला. राज्यपाल राधाकृष्णन यांनी शिंदेंची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून निवड केली आहे. आता सत्तास्थापनेसाठी होणार विलंब हा जनतेला चलबिचल करीत आहे. सत्तास्थापनेसाठी भाजपचे १३२ आमदार निवडून आले आहेत. तर ५ इतर आमदारांनी पाठिंबा दिला आहे. दुसऱ्या क्रमांकावर ५७ आमदार निवडून आले आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर ४१ आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे निवडून आले आहेत.
सर्वाधिक आमदार असल्यामुळे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असून एकनाथ शिंदे हे पक्षाध्यक्ष म्हणून शिवसेना संघटन वाढविण्यासाठी प्रयत्न करतील अशी माहिती हाती आली आहे. तर उप मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेतर्फे जेष्ठ पदाधिकारी दादा दगडू भुसे किंवा शंभूराज देसाई यांच्यापैकी एक हे उपमुख्यमंत्री होण्याची चिन्हे आता दाट होत आहे. यात उदय सामंत, दीपक केसरकर, भरत गोगावले यांचीही नावे पुढे आली होती. तर राष्ट्रवादीकडून अर्थातच अजितदादा हेच उप मुख्यमंत्री राहणार आहेत. तसेच, पंतप्रधान मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ६० वयापुढील आमदारांना मंत्रिपद देऊ नये, नवीन नेतृत्व निर्माण करा असा संदेश दिल्याने अनेक जेष्ठ पदाधिकाऱ्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता संपल्यात जमा आहे. यामध्ये चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक जेष्ठ वयाच्या नेत्यांचा समावेश आहे.