पाचोरा येथील प्राथमिक विद्यामंदिर येथील घटना
पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा येथील माणिकराजे शिवराम पवार ट्रस्ट संचलित प्राथमिक विद्यामंदिर, कोंडवाडा गल्ली या शाळेत मुख्याध्यापकाचा शाळेतच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना गुरुवारी दुपारी १२.३० वाजेचे सुमारास घडली. घटनेमुळे पाचोरा शहरात शोककळा पसरली आहे.
पंडित लोटन कुंभार (वय ४७) असे या मुख्याध्यापकाचे नाव आहे. दुपारी त्यांना शाळेत काम करीत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांच्या पत्नी मनीषा कुंभार यादेखील याच शाळेत शिक्षिका आहेत. त्यांना सहकारी शिक्षकांच्या मदतीने खासगी रुग्णालयात दाखल केले असता त्याठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मुलगा वेदांत हा रशियात वैद्यकीय शिक्षण घेत असून पंडित महाले हे नगरदेवळा येथील रहिवासी होते. घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात शोककळा पसरली आहे.