मुंबई (वृत्तसंस्था) – महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री ८ वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. आजच पुणे व पिंपरी चिंचवड येथील करोना निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली असून उर्वरित महाराष्ट्राला देखील असाच दिलासा मिळणार असल्याची चिन्हं आहेत. पुणे व पिंपरी चिंचवडमधील सर्व आस्थापना सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत खुल्या ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय पालकमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे.
तत्पूर्वी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच राज्यातील निर्बंध शिथिल करण्यात येतील असं सांगितलं होत. याच पार्श्वभूमीवर आज ते राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री निर्बंध कायम ठेवण्यात आलेल्या ११ जिल्ह्यांना दिलासा देणार असल्याचा अंदाज आहे.
राज्य सरकारने यापूर्वी पॉझिटिव्हिटी दर लक्षात घेत २५ जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल केले होते. मात्र पुणे, सातारा यांसह ११ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात आले नव्हते. या निर्णयाला व्यापारी वर्गाकडून कडाडून विरोध झाला होता. पुण्याचा पॉझिटिव्हिटी दर कमी असतानाही पुण्याला सूट का देण्यात आली नाही? असा प्रश्न महापौर मुरलीधर मोहोळ यांनी उपस्थित केला होता.
अशातच आज पुणे, पिंपरी-चिंचवड येथील निर्बंध शिथिल करण्यात आले असल्याने निर्बंध कायम असलेल्या इतर जिल्ह्यांनाही दिलासा देण्यात येणार असल्याची शक्यता आहे. याखेरीज मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल पुन्हा सुरु करण्याबाबतही नागरिकांनी आग्रही भूमिका घेतली आहे. भाजप, मनसे या पक्षांनीही सरकारवर याप्रश्नी दबाव टाकला आहे. त्यामुळे लोकल सुरु करण्यातबाबत मुख्यमंत्री आज निर्णय घेणार का याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.