नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) – मुकेश अंबानीं आता आपला उत्तराधिकारी शोधत असल्याची चर्चा आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी त्यांच्याकडे असलेल्या 15.48 लाख कोटीच्या व्यवसायाच्या साम्राज्यासाठी उत्तराधिकारी नेमण्याचा प्लॅन बनवत आहेत.
तेलापासून दूरसंचार क्षेत्रापर्यंत पसरलेल्या अवाढव्य व्यवसायासाठी मुकेश अंबानी यांनी वॉल्टन कुटुंबानं दाखवलेल्या मार्गावरून चालायचा निर्णय घेतलाय. जगातील सर्वात मोठ्या रिटेल चेनचे मालक वॉलमार्ट इंकचे संस्थापक सॅम वॉल्टन यांनी सोपे मॉडेल स्वीकारले. कुटुंबाला केंद्रस्थानी ठेवलेच पाहिजे, पण व्यवस्थापन नियंत्रण वेगवेगळ्या हातात देणे आवश्यक आहे, असे ते मॉडेल होते
64 वर्षीय मुकेश अंबानी यांची स्वतःची संपत्ती फक्त 7 लाख कोटी रुपये आहे. त्यांनी वारसदाराबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मुकेश अंबानी सक्रियपणे उत्तराधिकार योजना आखत असल्याचे कंपनीच्या सध्याच्या कामकाजावरून स्पष्ट होते. सध्या रिलायन्स इंडस्ट्रीजमधील मुकेश अंबानी यांचा हिस्सा मार्च 2019 मधील 47.27 टक्क्यांच्या तुलनेत 50.6 टक्के झालाय.
मुकेश अंबानींची मुले आता कुटुंबाच्या विशाल साम्राज्यात एक प्रमुख स्थान व्यापतील, त्यांची जुळी मुले आकाश आणि ईशा अंबानी किरकोळ आणि दूरसंचारसारख्या व्यवसायांमध्ये सक्रिय भूमिका बजावतायत. 2014 मध्ये दोघांनाही रिलायन्सच्या टेलिकॉम आणि रिटेल व्यवसायात संचालक करण्यात आले. सध्या त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी जिओ प्लॅटफॉर्ममध्ये संचालक आहे. तो रिलायन्स रिन्यूएबल एनर्जी आणि ऑईल अँड केमिकल युनिटचा व्यवसायही पाहत आहे.
‘रिलायन्स इंडस्ट्रीजवर संपूर्ण नियंत्रण मुकेश अंबानी, पत्नी नीता अंबानी, तिन्ही मुलांसह कुटुंबातील सर्व सदस्यांचे असेल. मुकेश अंबानी यांच्या निकटवर्तीयांचाही यात समावेश केला जाऊ शकतो. बाहेरील व्यावसायिकांवर कंपनीचा मुख्य व्यवसाय पाहण्याची जबाबदारी सोपवली जाणार आहे.