जळगाव — महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (चणकड), नाशिक च्या विद्यार्थी कल्याण विभागाच्या वतीने आयोजित परीक्षा तणावावर मात करण्याचे कौशल्य या महत्त्वपूर्ण व उपयुक्त ऑनलाईन सत्रात गोदावरी नर्सिंग महाविद्यालय, जळगाव येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
ऑनलाईन सत्र झूम मिटिंगद्वारे पार पडले, ज्यात एमयूएचएसचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू आणि विद्यापीठाच्या क्लिनिकल सायकोलॉजिस्ट सौ. मानसी हिरे यांनी मार्गदर्शन केले. या सत्रात विद्यार्थ्यांना तणाव व्यवस्थापन, लक्ष केंद्रित करण्याच्या तंत्रांचा वापर, आणि आत्मविश्वास वाढवण्याचे मार्ग याविषयी मोलाचे मार्गदर्शन मिळाले.विद्यार्थ्यांना तणावावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपयोगी तंत्रे, परीक्षा काळात मनःशांती राखण्याचे उपाय, आणि सकारात्मक दृष्टिकोन कसा ठेवावा याबाबत सखोल माहिती मिळाली. या सत्रानंतर विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास, तयारी, आणि मानसिक स्थैर्य याबाबत अधिक सक्षम झाल्याची भावना व्यक्त केली.एमयूएचएसच्या अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते आणि त्यांना परीक्षा स्वस्थ, आत्मविश्वासपूर्ण आणि संयमाने देण्याची प्रेरणा मिळते.