जळगाव तालुक्यातील कुसुंबाजवळची घटना
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव वरून घरी परतत असताना रस्त्यात कुत्रा आडवा आल्याने दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवार दि. ७ जुलै रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रमाणे एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.
गौरव उर्फ गणेश घनश्याम सोनार (वय २६, रा. कुसुंबा ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. कुसुंबा येथे आई आणि बहिणीसोबत राहतो. विविध खाद्यपदार्थांच्या आस्थापनांवर काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. दरम्यान रविवारी दि. ७ जुलै रोजी तो रात्री जळगाववरून कुसुंबा येथे घरी जात असताना विमानतळाजवळ कुत्रा आडवा आल्याने त्याच्या भीषण अपघात झाला.
त्याला जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकाच आक्रोश केला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनेची माहिती जाणून घेतली. पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.