जळगाव रेल्वे स्टेशनजवळची घटना
जळगाव (प्रतिनिधी) : येथील जळगावच्या रेल्वे स्थानकाजवळील फलाट क्रमांक ३ जवळ धावत्या रेल्वेतून पडल्याने एका ३० वर्षीय परप्रांतीय तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दि. १३ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रोशन भोलाराम (वय २९, रा. नागोर जिल्हा, राजस्थान) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात वडील, ३ भाऊ, पत्नी असा परिवार आहे. एक वर्षांपूर्वीच त्याचे लग्न झाले आहे. रावेर तालुक्यातील सावदा येथे एका ठेकेदारासोबत तो कामानिमित्त आला असल्याची माहिती मिळत आहे. जळगाव रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक तीनजवळ डाऊन रेल्वे मार्गावर खांबा क्रमांक ४१५/२७ जवळ एक तरुण पडलेला असल्याची माहिती मालगाडी चालकाने शनिवारी दि. १३ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता दिली. त्यानंतर लोहमार्ग पोलिस दलाचे पोहेकॉ सचिन भावसार व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आला. तेथे वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. सुरुवातीला तो अनोळखी म्हणून पोलिसांनी तपास सुरु केला. तपासाधिकारी पोहेकॉ सचिन भावसार यांना या तरुणाच्या खिशात डायरी सापडली. त्यात असलेल्या मोबाईल क्रमांकावरून नातेवाईकांची ओळख मिळाली. लोहमार्ग पोलिसांनी संपर्क साधला असता नातेवाईक राजस्थान येथून जळगाव येथे उद्या सकाळी पोहोचणार असल्याची माहिती मिळाली. याप्रकरणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.