पाचोरा पोलिसांपुढे आव्हान, मृत सार्वे येथील
पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील उमिया मार्बल समोरील हिरव्या गवतात अनोळखी तरुणाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत दि. २८ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास आढळून आला होता. अखेर त्याच्याजवळील मोबाईलवरून त्याची ओळख पटली. मयत पाचोरा तालुक्यातील सार्वे येथील रहिवासी आहे. घटनेची पाचोरा पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.
माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भडगाव रोडवर धाव घेत त्या स्थळावरून मृतदेह ताब्यात घेत जागेची पाहणी करत पंचनामा केला होता. त्यांना एक जिओ कंपनीचा मोबाईल आढळून आला होता. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने मृतदेहावरून ओळख पटविण्यासाठी मोठी अडचण पोलिसांसमोर होती. अखेर पाचोरा पोलिसांनी तातडीने मोबाईल रिपेअर करून त्याचा डिस्प्ले बसवून मोसुरु केला. त्यातील नंबरचा आधार घेत शोध घेतला असता सदर मृतदेह पाचोरा तालुक्यातील सार्वे प्र. बो.येथील विष्णू युवराज दुधे (वय ३१) याचा असल्याचे समोर आले.
सदर युवक हा सिल्लोड येथे तीन वर्षांपासून कामानिमित्त गेलेला होता. तर त्याची पत्नी ही दोंडाईचा येथे राहत होती. मात्र युवक पाचोरा येथे अशा अवस्थेत आढळून आल्याने युवकासोबत नेमके काय घडले, हेअद्याप अस्पष्ट आहे. पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. कुजलेल्या अवस्थेत ओळख न पटू शकत असलेला मृतदेहाची ओळख काही तासातच पटविल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे. यात पोलीस उपअधीक्षक धनंजय येरुळे, पोलीस निरीक्षक राहुल खताळ, पीएसआय योगेश गणगे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार मल्हार देशमुख, कॉन्स्टेबल संदीप भोई, प्रकाश शिवदे, योगेश पाटील यांनी तपास लावला.