मुंबई (वृत्तसंस्था)– सुशांतसिंग राजपूत या उमद्या अभिनेत्याच्या अकस्मात निधनाने हादरलेल्या बॉलीवूडला गेल्या काही महिन्यांपासून बरेच धक्के मिळत आहेत. सुशांतसिंग राजपुतच्या मृत्यूचे रहस्य अजून उलगडलेले नाही. मात्र नुकतेच एम्स डॉक्टरांच्या समितीने अभ्यासात समोर आलेले तथ्य आणि माहिती सीबीआयकडे सोपवली आहेत. त्यामुळे एम्सच्या डॉक्टरांनी दिलेल्या अहवालानंतर सीबीआय तपासाची पुढील दिशा ठरवण्याची शक्यता आहे.
यातच काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करत याच मुद्यावरून निशाणा साधला आहे.’सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात एम्स रुग्णालयाचा अहवाल आल्याने भाजपाचं तोंड काळं झालं आहे. तसंच सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचं राजकारण करण्याचं भाजपाचं षडयंत्रही बाहेर आलं आहे अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
तत्पूर्वी,एम्स डॉक्टरांच्या समितीने अभ्यासात समोर आलेले तथ्य आणि माहिती सीबीआयकडे सोपवली आहेत. सोमवारी यासंबंधी सविस्तर बैठक पार पडली’. एम्स डॉक्टरांनी दिलेली माहिती आणि गेल्या ४० दिवसांत सीबीआय तपासात आलेल्या गोष्टी एकत्र करुन पडताळून पाहिल्या जात आहेत. सूत्रांनुसार, एम्सच्या डॉक्टरांनी दिलेली माहिती तज्ञांचं मत म्हणून ग्राह्य धरलं जाणार असून त्यांना साक्षीदार म्हणूनही उभं केलं जाऊ शकतं.