रावेर पोलीस स्टेशनची कारवाई
रावेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील अंतर्गत पाल ते खरगोन रस्त्यावर एका हॉटेलसमोर गावठी देशी बनावटीचे पिस्तूल विक्री करण्यासाठी आलेल्या सराईत गुन्हेगाराला मुद्देमालासह रावेर पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे.
पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यांनी उपनिरीक्षक तुषार पाटील, हेडकॉन्स्टेबल रवींद्र वंजारी, सचिन घुगे, प्रमोद पाटील, विशाल पाटील, महेश मोगरे, विकार शेख अशांचे पथक तयार केले. पथकाने पाल ते खरगोन रस्त्यावर हॉटेल जय पॅलेस समोर एका संशयित तरुणाला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता गावठी बनावटीच्या दोन रिवाल्वर आणि दोन जिवंत काडतूस असा एकूण ५१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याप्रकरणी संशयित आरोपी तोफसिंग चतरसिंग चावला (वय २७ रा. धसली, ता. झिरण्या जि. खरगोन, मध्य प्रदेश) याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. कॉन्स्टेबल महेश मोगरे यांनी फिर्याद दिली आहे. रावेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.