जीएमसीसमोरून दुचाकी चोरीचे सत्र थांबेचना…
जळगाव (प्रतिनिधी) :- येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशाद्वारासमोर उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता उघडकीला आली आहे. याबाबत गुरूवारी ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जाफर शेख अन्वर (वय-३२, रा. पिंप्राळा, जळगाव) हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. २८ सप्टेबर रोजी सायंकाळच्या सुमारास जाफर शेख अन्वर हा त्याची दुचाकी (एमएच १९ बीए ७६१२) ने जळगाव शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांना भेटण्यासाठी आलेला होता. त्यावेळी त्याने त्याची दुचाकी वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ उभी केलेली होती. त्यानंतर तो रुग्णालयात नातेवाईकांना भेटण्यासाठी निघून गेला.
सायंकाळी साडेसात वाजता काम आटोपून परत जाफर अन्वर हा घरी जाण्यासाठी पुन्हा दुचाकीजवळ आला असता त्याला जागेवर दुचाकी मिळाली नाही. गुरूवारी ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात येवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विनोद भोळे करीत आहे.