मृतांची संख्या ५
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील एमआयडीसी कंपनीतील डी-सेक्टर मधील मोरया केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना बुधवारी दि. १७ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता घडली होती. या आगीत ४ जणांचा मृत्यू तर २४ जखमी होते. आता मृतांचा आकडा वाढला असून एका तरुणाचा उपचारादरम्यान छत्रपती संभाजीनगर येथे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मोरया केमिकल कंपनीच्या आगीप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. यात दोघांना अटक होऊन पुढील कार्यवाही पोलिसांनी केली आहे. या आगीत समाधान नारायण पाटील, रामदास घाणेकर, किशोर चौधरी, दीपक सुवा या चौघांचा मृत्यू झाला आहे. तर २४ जण जखमी झाले आहे. दरम्यान, जखमींपैकी मेहरूण परिसरात राहणार सचिन चौधरी हा छत्रपती संभाजीनगर येथे खाजगी रुग्णालयात उपचार घेत होता. मंगळवारी दि. २३ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला आहे.
यामुळे सचिनच्या कुटुंबावर आघात कोसळला आहे. सचिन चौधरी याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, २ बहिणी असा परिवार आहे. मोरया कंपनीत गेल्या ७ वर्षांपासून तो काम करीत होता. यामुळे मेहरूण परिसरात शोककळा पसरली आहे.