जळगावात मायादेवी मंदिरजवळ घडली घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील महाबळ रस्त्यावरील मायादेवी मंदिर परिसराजवळ सकाळी फिरण्यासाठी निघालेल्या प्रौढाला दुचाकीस्वाराने जबर धडक दिली. यात रस्त्यावर जोरात आपटून डोक्याला गंभीर मार लागल्याने प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. रामानंद नगर पोलीस स्टेशनला मृत्यूची नोंद करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
सतीश जगन्नाथ सुलक्षणे (वय ५६, रा. नागेश्वर कॉलनी, जळगाव) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, १ मुलगा, २ विवाहित मुली असा परिवार आहे. खाजगी व्यवसाय करून ते परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते.(केसीएन)दरम्यान, सोमवारी दि. १६ रोजी सतीश सुलक्षणे हे सकाळी ७ वाजता फिरण्यासाठी गेले होते. मायादेवी मंदिराजवळ आले असताना एका दुचाकीस्वाराने त्यांना जबर धडक दिली. या धडकेत सतीश हे रस्त्यावर फेकले जाऊन त्यांच्या डोक्याला जबर मार लागला.
कुटुंबीयांनी व नागरिकांनी सतीश यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरु असताना सतीश सुलक्षणे यांचा बुधवारी दि. १८ जून रोजी सकाळी ११. ४० वाजता मृत्यू झाला. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.(केसीएन)त्यांचा मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आला होता. रामानंद नगर पोलीस स्टेशनला मृत्यूची नोंद घेण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.