जळगाव महानगरपालिकेने केले हात वर, नागरिकांचा संताप
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील मोहन नगर येथे शनिवारी एका पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घालून ७ जणांना गंभीर चावा घेतल्याची घटना आज दि. ३१ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. जखमीमंध्ये २ लहान मुलांचा समावेश असून त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे. नागरिकांनी पकडण्याबाबत महानगरपालिकेला फोन केला असता, असमाधानकारक उत्तरे देऊन अधिकाऱ्यांनी हात वर केले. यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला.
जळगाव शहरात कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. डॉग व्हॅन देखील बंद पडली आहे. मनपा आता भटक्या कुत्र्यांवर कुठलीच कारवाई करीत नाही. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात शहरातील दररोजचे ८ ते १२ जण कुत्रे चावल्याने जखमी होत आहेत.(केसीएन) तर शनिवारीदेखील महाबळ परिसरातील मोहन नगर परिसरातील नागरिकांवर बिकट परिस्थिती आली. विनोद गुजराती (वय ८) भिक्षेकरी मुलाच्या मागे एक पिसाळलेले कुत्रे लागले. त्या मुलाच्या आवाजामुळे सुरेश बाबुराव माळी (वय ६०) हे हातातील बादली घेऊन कुत्र्याला हाकलायला गेले असता त्यांनाही कुत्र्याने चावा घेतला.
यावेळी आजूबाजूचे नागरिक धावून आले. त्यांनीहि कुत्र्याला हाकलले. मात्र या कुत्र्याने हरीश शंकरलाल नाथानी (वय ५०), गणेश युवराज चौधरी (वय २६), गितेश युवराज बाविस्कर (वय १३), मयूर अरुण ठाकरे ( वय २९) यांच्यासह आणखी एकाला चावा घेतला. यावेळी इतर नागरिकांनी तत्काळ जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले. (केसीएन)त्याठिकाणी वैद्यकीय पथकाने त्यांच्यावर उपचार केले. यावेळी काहींनी महापालिकेला कुत्रा पकडण्याविषयी सांगितले. मात्र आता आम्ही कुत्रे पकडत नाही. आमचा तो विषय नाही असे असमाधानकारक उत्तर देऊन टाळले. मात्र यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.