फ्रीज, गॅस सिलिंडर आणि घरगुती वस्तू जळून खाक
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील मोहन नगर परिसरातील नूतन वर्षा कॉलनी येथे गुरुवारी सायंकाळी सुमारे सात वाजेच्या सुमारास लागलेल्या आगीच्या घटनेने परिसरात एकच गोंधळ उडाला. विठ्ठल मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या एका घरातून अचानक धुराचे लोट निघू लागले आणि क्षणार्धात ज्वाळांनी उग्र रूप धारण केले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र आग भडकत गेल्याने त्यांनी तत्काळ अग्निशमन दलाला याची माहिती दिली.
या घटनेची माहिती मिळताच रवींद्र सुखदेव सपकाळे यांनी कळविले. त्यानंतर अग्निशमन दलाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि जलदगतीने आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले. दीड तासांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. या आगीत घरातील फ्रीज, गॅस सिलिंडर तसेच इतर संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
आग विझविण्याच्या मोहिमेत अग्निशमन विभागाचे वाहनचालक संतोष तायडे, फायरमन रोहिदास चौधरी, वृषभ सुरवाडे, तेजस बडगुजर, गणेश महाजन, महेश पाटील, भूषण पाटील, सत्तार तडवी, विशाल पाटील आणि गौरव पाटील यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या तात्काळ उपस्थितीमुळे आणि समन्वयामुळे मोठा अनर्थ टळला.
दरम्यान, आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी प्राथमिक अंदाजानुसार गॅस सिलिंडरजवळील विद्युत तारा शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.









