जळगाव तालुक्यातील मोहाडी रेल्वेरूळांवरील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील मोहाडी गावात राहणाऱ्या एका ४५ वर्षीय व्यक्तीचा धावत्या रेल्वेखाली आल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी २ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून, सकाळी १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात यासंदर्भात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जयेश भागवत चौधरी (वय ४५, रा. मोहाडी, ता. जळगाव) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. जयेश चौधरी हे मोलमजुरी करून उदरनिर्वाह करीत होते. गेल्या रविवार, ३१ ऑगस्टपासून ते घरात कोणालाही काहीही न सांगता निघून गेले होते. त्यानंतर त्यांची शोधाशोध सुरू होती, परंतु ते कुठेही सापडले नव्हते. अखेर, मंगळवारी रात्री मोहाडी गावाजवळील रेल्वे रुळावर त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेतली आणि मृतदेहाची ओळख पटवली. जयेश चौधरी यांचा धावत्या रेल्वेखाली आल्यानेच मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून, या घटनेची सखोल चौकशी केली जात आहे.









