नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोनास्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. नरेंद्र मोदी ४.३० वाजता बैठक घेणार असून यावेळी स्थितीचा आढावा घेणार आहेत. यादरम्यान काही महत्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.
देशात आता पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी निर्बंध कठोर केले आहेत.रविवारीदेखील देशातील बाधितांचा आकडा दीड लाखांच्या पुढे गेला आहे.
एका दिवसात सापडलेल्या बाधितांची ही सर्वात मोठी संख्या आहे. रविवारी १,५९,६३२ नवीन रुग्ण आढळले. त्याचवेळी ४०,८६३ रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या २४ तासांत करोनामुळे ३२७ मृत्यू झाले आहेत. दैनिक पॉझिटिव्हीटी रेट १०.२१ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या ३,४४,५३,६०३ आहे. ४,८३,७९० लोकांना या संसर्गजन्य आजाराने आपला जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत १५१.५८ कोटी इतके लसीकरण करण्यात आले आहे.
आग्नेय आशियातील बहुतांश देशांत रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने शनिवारी सर्वच देशांना सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक उपाययोजनांची कठोर अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले आहे. ओमायक्रॉन हे उत्परिवर्तन हे कमी घातक असल्याचे दिसत असले तरी, ते सौम्य समजून त्याकडे दुर्लक्ष करू नका, असा इशाराही जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या आग्नेय आशियाच्या प्रादेशिक संचालक डॉ. पूनम खेत्रपाल यांनी सांगितले की, जगात पसरत चाललेला हा एक प्रमुख विषाणू आहे. जगभरात त्यामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे, मृत्यूही होत आहेत, असे त्या म्हणाल्या. डेल्टासारखी अन्य उत्परिवर्तनेही सध्या पसरत आहेत. त्यांच्यामुळे गंभीर आजार, मृत्य होतो. रुग्णांलयांवर विनाकारण मोठा ताण येणार नाही याची दक्षता घ्यावी. तसे झाल्यास ज्या रुग्णांना गरज आहे, त्यांना वेळीच उपचार मिळणार नाहीत, अन्य आजारांच्या गंभीर रुग्णांवरही उपचार करून त्यांचे जीव वाचविता येणार नाहीत.